एपीएमसीत आज 1 हजार 166 गाड्यांची आवक

फळ, भाजीपाल्याच्या 651 गाड्या मुंबई, उपनगरांमध्ये रवाना

शेतकऱ्यांचा संप सहाव्या दिवशीही सुरूच

मुंबई, 5 जून 2017/AV News Bureau:

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सहावा दिवस आहे. मात्र इतर राज्यांमधून भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची आवक सुरू असून वाशीच्या एपीएमसीत 1 हजार 166 गाड्यांची आवक झाली आहे. यामुळे या संपाचा मुंबई आणि उपनगरात फारसा परिणाम जाणवत नसला तरी ग्रामीण भागात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या संपाचा छोट्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक, जालना, बुलडाणा, पुणतांबा, सोलापूर, अमरावती या भागांमध्ये संप सुरू आहे. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अमरावती जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या घरासमोर भाजीपाला फेकून दिला. नाशिक बाजारपेठ या संपामुळे बंद पडली आहे. तर  पुणे आणि नवी मुंबई बाजार समिती आवारात कृषी मालाची आवक सुरू आहे.

दरम्यान, वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवक सुरू आहे.  5 जून रोजी रात्री 10 ते 6 जून रोजी सकाळी 10 या काळात 1 हजार 166 गाड्यांची आवक एपीएमसी आवारात झाली आहे. फळमार्केटमध्ये 333, भाजीपाला मार्केटमध्ये 424 गाड्यांची आवक झाली. तर कांद्याच्या 86 बटाट्याच्या 55 आणि लसूणच्या 12 गाड्या कांदा बटाटा मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. याशिवाय मसाला मार्केटमध्ये 72 आणि धान्य मार्केटमध्ये 184 गाड्यांची आवक झाली आहे. यातील 159 गाड्या फळमार्केटमधून तर 492 गाड्या भाजीपाला मार्केटमधून मुंबई आणि उपनगरांमध्ये माल घेवून गेल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक कालच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर किलोमागे 1 ते 2 रुपयांनी कमी झाल्याची माहिती राजेंद्र शेळके यांनी दिली. आज घाऊक बाजारात कांद्याचे दर साधारणपणे 10 ते 11 रुपये इतके आहे.

12 जून रोजी नवी मुंबई बंदची हाक

दरम्यान, या संपाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 12 जून रोजी नवी मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी दुपारी 4 वाजता कोकण आयुक्तांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.