नवी मुंबई विमानतळाच्या पूर्व विकास कामांना सुरूवात

नवी मुंबई, 16 जून 2017/AV News Bureau:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नसतानाच सिडकोने विमानतळ उभारणीपूर्व कामाला १५ जूनपासून सुरूवात केली आहे. विमानतळाच्या जागेवरील टेकडीचे सपाटीकरण आणि मातीचा भराव टाकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सिडकोच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण मंत्रालयाने एप्रिल महिन्यात पूर्व विकास कार्यक्रमास हिरवा कंदीला दाखवला होता. मात्र पुनर्वसनाच्या मुद्दयावर  विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी कामाला विरोध केला होता. या प्रकल्पामुळे बाधित होणा-या १० पैकी २ गावांची सहमती अजून बाकी आहे. त्यामुळे या गावांशी सिडकोची बोलणी सुरू आहेत. विमानतळाला पर्यावरण तसेच इतर संबंधित मंत्रालयांकडून परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे विमानतळ उभारणीच्या मार्गातील परवानग्यांचे अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे विमानतळ उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उलवे टेकडीचे (९८ मी उंच व ३.५ किमी लांब)  सपाटीकरण, जमीनीचे सपाटीकरण, गाढी आणि उलवे नदीचे पात्र वळविणे, उच्च दाबाच्या विजेच्या वाहिन्या हटवणं या कामांना आजपासून प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या कामांना दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे मात्र सिडकोने ही कामे केवळ १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे ठरविले आहे.