सरकारने बीफची परिभाषा स्पष्ट करावी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई 13 जुलै 2017/AV News Bureau:

कथित गोरक्षकांकडून सध्या बीफ बाळगत असल्याच्या संशयावरुन गोरगरीब लोकांवर तसेच अल्पसंख्याक व दलित समाजातील व्यक्तींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. याप्रकारांनी देशातील सामाजिक वातावरण दुषित होत चालले आहे. त्यामुळे सरकारने कोणकोणत्या प्राण्यांचे मांस बीफ या प्रकारात मोडते याची नेमकी परिभाषा निश्चित करुन त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
गुजरात,हरियाणा, झारखंडच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातही गोमांसाच्या संशयावरुन होणाऱ्या मारहाणीचे लोण पोहचले आहे. काल नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील बारशिंगी गावात एका व्यक्तीला बीफ बाळगल्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली. वास्तविक ही व्यक्ती नागपूर येथील कायदेशीर कत्तलखान्यातून मांस विक्रीसाठी घरोघरी पोहचवून आपला उदरर्निवाह करत होती. परंतु गोमांस बाळगत असल्याच्या संशयावरुन त्याला कथित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आली. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यानी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, असे मलिक यांनी सांगितले.

सरकारने नेमकी बीफची परिभाषा निश्चित करावी कारण बीफ या प्रकारात गायी, बैल सोबतच रेडा आणि म्हैशीच्या मांसाचा समावेश होतो. आपल्याकडे गायी आणि बैलाच्या हत्येवर कायद्याने बंदी आहे. परंतु रेडा आणि म्हैशींच्या कत्तलखान्यातील हत्येला बंदी नाही. त्यामुळे रेडा आणि म्हैशीचे मांस बाळगणे हे कायदेशीर आहे. याबाबत सरकारने जनजागृती करण्याची गरज असून त्याव्दारे गोरक्षणाच्या नावाखाली गोरगरिबांना मारहाण करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज असल्याचे मत यावेळी मलिक यांनी व्यक्त केले.