संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

नवी दिल्ली, 17 जुलै 2017/AV News Bureau:

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसोबतच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. 17 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान 19 दिवस पावसाळी अधिवेशनाचे काम चालणार आहे. या अधिवेशनात 16 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली.

संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष विविध मुद्यांवर  केंद्र सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या अधिवेशनात 16 नवीन विधेयके मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट बिल, पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप बिल, मोटर व्हेइकल अमेंडमेंट बिल आदींचा समावेश आहे. याशिवाय लोकसभेत 8 आणि राज्यसभेत 10 जूनी प्रलंबित विधेयके आहेत. त्यावरही सरकार जोर देण्याची शक्यता आहे. याच अधिवेशन काळात 5 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाचीही निवड होणार आहे.

अधिवेशनात हे मुद्दे कळीचे ठरण्याची शक्यता

  • गोरक्षेच्या नावावर सुरु असलेला हिंसाचार
  • काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि तणाव
  • दार्जिलिंग वाद
  • चीनसोबत सध्या सुरु असलेला तणाव
  • शेतकऱ्यांचे प्रश्न