देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बस

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 18 ऑगस्‍ट 2022:

“नरिमन पॉइंट ते  दिल्ली जोडण्याची माझी योजना आहे आणि त्याचे 70 टक्के काम याआधीच पूर्ण झालेले आहे. मुंबईहून दिल्लीला केवळ 12 तासांत पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करावी.” असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केले. स्विच ईआयव्ही 22 (Switch EiV 22) या नावाच्या अशोक लेलँड कंपनीच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

देशाच्या  वाहतूक व्यवस्थेत परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देत, आम्ही कार्बन उत्सर्जन कमीत कमी असेल तसेच जास्त  प्रवासी क्षमता असलेल्या एकात्मिक इलेक्ट्रिक वाहनांची वाहतूक व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. असेही गडकरी यावेळी म्हणाले.

वाहनांसाठी विजेचा इंधन म्हणून वापर होणे, हे डिझेलसारख्या इतर इंधनांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. “कच्च्या तेलाची आयात हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर देखील वीजेचा खर्च कमी करण्यात मोठा हातभार लावतो आहे.” असे त्यांनी सांगितले.

वाहन उद्योग क्षेत्रासाठी, आपल्या योजना सांगतांना, गडकरी म्हणाले, “देशातील सध्याचा वाहन उद्योग, 7.5 लाख कोटी रुपयांचा असून, 2024 च्या अखेरीपर्यंत हा उद्योग, 15 लाख कोटींपर्यंत वाढवण्याचे माझे स्वप्न आहे.” असे सांगत, हे ध्येय साध्य करण्यासारखे आहे, असे ते पुढे म्हणाले. या क्षेत्रात रोजगाराच्या सर्वाधिक संधी असून, केंद्र आणि सरकारला सर्वाधिक करमहसूल मिळवून देणारेही हे क्षेत्र आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बसविषयी माहिती

स्विच ईआयव्ही 22  ही  देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बस आहे, ज्याची संरचना, विकास आणि उत्पादन भारतातच झाले आहे.  स्विच ईआयव्ही 22   ह्या बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.

सिंगल डेकर (साध्या) बसेस च्या तुलनेत, स्विच डबल डेकर बसमध्ये दुप्पट प्रवासी प्रवास करु शकतात, विशेष म्हणजे यासाठी गाडीच्या निव्वळ वजनात (प्रवाश्यां विना) (कर्ब वेट) केवळ 18 टक्के वाढ झाली आहे. आधुनिक संरचना आणि  अंतर्बाह्य आरामदायी सुविधा आणि आकर्षक स्वरुप असलेल्या ह्या डबल डेकर बसेस मध्ये, पुढचा आणि मागचा असे दोन्ही दरवाजे विस्तीर्ण आहेत. आधुनिक सुरक्षा सुरक्षा मानकांची पूर्तता करणारा आपत्कालीन सुरक्षा दरवाजा आहे. भारताच्या उष्ण हवामानासाठी या बसमध्ये प्रभावी  वातानुकूलित व्यवस्था  आहे. यांची आसन क्षमता 65 इतकी असून, अशा प्रकारच्या रचनेतील बसेस मध्ये ही सर्वाधिक आसनक्षमता आहे. प्रत्येक खुर्चीला हलक्या वजनाची कुशन्स लावली आहेत, आणि आसनांची अंतर्गत रचना कारसारखी आरामदायी आहे. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस, शहरातील प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती देणारी आदर्श सार्वजनिक वाहने आहेत कारण, त्यांना रस्त्यावर तसेच टर्मिनल आणि डेपो मध्ये जागा कमी लागते.

——————————————————————————————————