लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य – शरद पवार

 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई  २३ मे २०१९

 आज जो निकाल आलाय त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती. मात्र लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य आहे. महाआघाडीने जो प्रयत्न केला त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार… कार्यकर्त्यांना धन्यवाद… आणि लोकांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या लोकसभा निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • आज दुपारी मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांना संबोधित केले.या पराभवाचा विचार नक्की करू… लोकांशी संपर्क वाढवू… निवडणूक झाली आहे… निकाल लागले आहेत… राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो तसाच सुरु ठेवणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
  • ज्या जागा आम्ही गमावल्या त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. मागच्या वेळी मतांचे मार्जिन मोठे होते. यावेळी मतांचे तेवढे मार्जिन नाही. या निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. यश हे यशच असतं ते आम्ही स्वीकारलं आहे असेही शरद पवार म्हणाले.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक असो किंवा मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील निवडणूका असतील त्यावेळी कोणताही संशय घेण्यात आला नाही परंतु यावेळेला झालेल्या निवडणुकीत निवडणूक आयोग असो की सत्ता चालवणारे सत्ताधारी असोत यांच्याबद्दल देशभरात संशयाचे वातावरण होते हे नक्की परंतु निकाल काही वेगळाच आला आहे असेही शरद पवार म्हणाले.
  • आमचा ११ जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले.
  • महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ४ जागा जिंकल्या आहे. आज निकाल आला आहे, आमची अपेक्षा जास्त होती. लोकांनी जे मतदान केले त्याबाबत शरद पवार यांनी महाआघाडीतर्फे जनतेचे आभार मानले.

===================================================

इतर बातम्यांचाही मागोवा