नवी मुंबईतील पार्किंगबाबत सर्वेक्षण करणार

नवी मुंबई, 14 डिसेंबर 2017/ avirat vaatchal news:

नवी मुंबई शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्राच्या हद्दीत पार्किंगचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे.  आय.आय.टी. मुंबई ही संस्था हे सर्वेक्षण करणार आहे.

नवी मुंबईतील पार्किंगचे शास्रोक्त सर्वेक्षण करण्याबाबतचे आदेशन मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन महानगरपालिका क्षेत्रांतर्गत पार्कींगचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करणार आहे. हे  सर्वेक्षण न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे बंधन महापालिका प्रशासनावर आहे. सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी आणि प्रतिनिधी यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीत पार्कंगची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. अनेक ठिकाणी नो पार्किंगमध्येच गाड्या उभ्या केलेल्या असतात. तर काही ठिकाणी पदपथांवरदेखील गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल होते. शिवाय नवी मुंबई परिवहनच्या बस थांब्यांवरदेखील खासगी वाहने उभी केलेली आढळून येतात. मात्र अशा वाहनांवर महापालिका प्रशासन तसेच संबंधित इतर यंत्रणांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बस पकडण्याठी थांब्याजवळच उभ्या केलेल्या वाहनांना ओलांडत धावपळ करावी लागते. याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, परंतु त्याआधी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, जेणे करून अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांवर अंकूश राहील, अशी भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.