नागरिकांना तत्पर सेवा द्या

कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील

अविरत वाटचाल

नवी मुंबई , 21 एप्रिल 2018:

लोकांमध्ये व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शासन, प्रशासन व लोक यातील दरी कमी करून प्रशासकीय सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहच‍विणे हे आपले कर्तव्य आहे. प्रशासनात लोकसहभाग महत्वाचा आहे. आपण प्रशासकीय सेवा करताना नागरिकांना तत्पर सेवा देणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी आज केले. कोंकण भवन येथे नागरी सेवा दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) श्रीमती आर.विमला, उपायुक्त (सामान्य) महेंन्द्र वारभुवन, उपायुक्त (महसूल) सिताराम सालीमठ, उपायुक्त (करमणूक) शिवाजी कादबाने, उपायुक्त (नियोजन) बा.ना.सबनीस, मुंबई विद्यापीठाचे प्रा.भीम रासकर तसेच कोकण भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कल्याणकारी योजना या शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या पाहिजेत. इज ऑफ डूईंग बिझनेस सगळीकडे पोहचला पाहिजे. प्रशासनाला मानवी चेहरा असला पाहिजे. प्रशासनात काम करताना आपण आपल्या कामाची जबाबदारी समजून अधिकाराचा वापर करा व नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून काम करा. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

आर विमला म्हणाल्या की, लोकांसाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा. आपण 24 तास आपले काम प्रामाणिकपणे करत असतो. पण आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन ही प्रत्येक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी आहे.  असेही त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी भीम रासकर मुंबई विद्यापीठ यांनी सहभागात्मक प्रशासन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त (सामान्य) महेंन्द्र वारभुवन यांनी केले. या कार्यक्रमास कोकण भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.