कर्नाटक विजयाबद्दल भाजपचा मुंबईत जल्लोष

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 15 मे 2018:

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जबरदस्त यशाबद्दल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कर्नाटकमधील यशाबद्दल पाटील दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा व कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तसेच सध्या चालू असलेल्या पालघर व भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच विजयी होईल असे त्यांनी सांगितले.

 

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, आ. भाई गिरकर, आ. सरदार तारासिंह, आ. राज पुरोहित, आ. अतुल सावे, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके व अतुल शाह उपस्थित होते.

 

  • दानवे म्हणाले की, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर जम्मू – काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत भाजपाला सर्वत्र विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. कर्नाटकमधील विजयामुळे भाजपाचे दक्षिणेचे दार उघडले असून आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे.  भाजपाच्या प्रचारासाठी आ. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नांदेडमधील अनेक कार्यकर्ते कर्नाटकमध्ये गेले होते. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पालघर व भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीत भाजपाच विजयी होईल. पालघरमध्ये काही जणांनी राजकारणाचे नियम मोडले त्यांना जनता बाद करेल. कोणी कितीही कपट कारस्थान केले तरी भाजपाचा विजय निश्चित आहे, असे दानवे यांनी सांगितले.

 

  • आ. आशिष शेलार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि कर्नाटकतील गरिबांचे नेतृत्व येडियुरप्पा यामुळे त्या राज्यात भाजपा विजयी झाला. लिंगायत, वोक्कलिग, मुस्लिम अशा सर्व समुदायांनी भाजपाला पाठिंबा दिला. बेळगाव व सीमावर्ती भागात मित्र पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादीला साथ दिली तरीही तेथे भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या