दशरथ भगत दसऱ्यापासून नव्या भूमिकेत

  • नवी मुंबई काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 14 ऑक्टोबर 2018:

नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार झालेले माजी ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत येत्या दसऱ्याला पत्रकार परिषद घेवून आपल्या आगामी वाटचालीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. सध्या नवी मुंबई काँग्रेसचे वारु भरकटलेले आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे दशरथ भगत पक्षात असून नसल्यासारखे दिसत आहेत. आगामी काळात आपण नव्या भूमिकेत दिसणार असून लवकरच त्याबाबत येत्या दसऱ्याला घोषणा करणार असल्याचे दशरथ भगत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दशरथ भगत नवा घरोबा करणार कि नवा पर्याय निर्माण करणार हे येत्या दसऱ्यालाच उघड होणार आहे.

 

  • स्थानिक भूमीपूत्र असलेले दशरथ भगत हे आक्रमक नेतृत्वासाठी ओळखले जातात. अनेक आंदोलनांमध्ये ते आघाडीवर राहीलेले आहेत. नवी मुंबईच्या राजकारणाचा विचार करता सत्ताधाऱ्यांसाठी ते नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. नवी मुंबई महापालिकेतील महापौर निवडणुक असो वा इतर नेमणुका असो. दशरथ भगत यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत कुरघोडीमुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

  • दशरथ भगत यांच्या जागी अनिल कौशिक यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. शिथिल पडलेल्या नवी मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम अनिल कौशिक यांच्या शिरावर आहे. या कामात त्यांना माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी आदींचा पाठींबा मिळेल, असे बोलले जाते. मात्र सध्या या स्थानिक नेत्यांमध्ये एकसूत्रता दिसत नसून कोणताच ठोस कार्यक्रम नसल्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व कमजोर झाले आहे.

काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत तयारी करीत आहे. नवी मुंबईचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेस कमजोर आहे. त्यामुळे काँग्रेसने कितीही उड्या मारल्या तरी ठाणे लोकसभेची जागा आणि विधानसभेच्या दोन जागा या राष्ट्रवादीच्याच वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे. तर आघाडीचा धर्म म्हणून नवी मुंबई काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारांचा प्रचार करण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे आगामी  निवडणुकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी कितपत मेहनत घेईल,याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत येत्या दसऱ्याला कोणते पाऊल उचलणार हे महत्वाचे ठरणार आहे.

============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • काम चोख करणाऱ्यांनाच निवडणुकीचे तिकीट -गणेश नाईक

=============================================================================================================

  • सिडकोनेे जमिनी फ्री होल्ड कराव्यात- गणेश नाईक