नवी मुंबई महानगरपालिकेला ‘AA+ STABLE’ मानांकन

आर्थिक सक्षमतेचे  सलग पाचव्यांदा मानांकन
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ८ जून २०१९:

“इंडिया रेटींग अँड रिसर्च” या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस “डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)” हे पत मानांकन यावर्षीही जाहीर झाले असून असे मानांकन सातत्याने पाचव्या वर्षी मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.

नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा मिळतील याकडे लक्ष देतानाच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी महसूलाच्या बाबींकडेही काटेकोर लक्ष दिल्याने समतोल राखला जाऊन हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. महापौर जयवंत सुतार आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी आर्थिक क्षमतेचे हे मान्यताप्राप्त पत मानांकन प्राप्त झाल्याबाबत अभिनंदन केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2018-19 वर्षाच्या अर्थसंकल्पात रू. 2064 कोटी 3 लक्ष जमा तसेच 1762 कोटी 28 लक्ष इतका खर्च झालेला असून नागरिकांना अभिप्रेत असणा-या विविध नागरी सुविधांची परिपूर्ती करण्याकडे व लोककल्याणकारी सुविधा पुरविण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे.

यावर्षी रूग्णालय सुविधांची पूर्तता, डिजीटल क्लासरूम संकल्पनेसह शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास, अडथळाविरहित पदपथ-रस्ते, विविध समारंभांसाठी सभागृहे उपलब्धता, सायकल ट्रॅक निर्मिती, स्मृतीवन संकल्पना अशी नानाविध विकासकामांची प्राधान्य लक्षात घेऊन पूर्तता करण्यात आलेली आहे. तसेच विविध लोकोपयोगी योजना-उपक्रम राबविण्यात आले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ मध्ये राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाचा बहुमान आणि “नागरिकांचा प्रतिसाद” क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहराचा बहुमान महानगरपालिकेस लाभला आहे. निवास योग्य शहरांमध्ये देशातील व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई मान्यताप्राप्त ठरले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ या अभिनव प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. याव्दारे कामकाजात पारदर्शकता आली असून पेपरलेस व गतीमान प्रशासन प्रभावीपणे राबविले जात आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही थकीत कर्ज, व्याज अथवा कर बाकी नाही.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च यामुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सक्षम असून नवी मुंबई महानगरपालिकेस “इंडिया रेटींग अँड रिसर्च” या नामांकीत संस्थेमार्फत “AA+ Stable” हे पत मानांकन सातत्याने पाचव्या वर्षी लाभले आहे.

——————————————————————————————————

इतरही बातम्यांचा मागोवा