थल सेना दिवसानिमित्त कोकण भवनमध्ये रक्तदान शिबीर

माजी सैनिकांचा लक्षणीय सहभाग

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 जानेवारी 2021:

भारतीय सैन्य दिनानिमित्त कोकण भवन येथे शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य (मुंबई विभाग), राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांच्या सहकार्याने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड मुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदानाचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. कोकण विभागातील  शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे माजी सैनिकांचा सहभाग हा लक्षणीय होता.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य (मुंबई विभाग) विभागाचे सल्लागार रमेश जैद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे मेजर प्रांजल जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर कॅ. विद्या रत्नपारखी, राज्य समन्वयक दिलावर शादीवान, नायब तहसिलदार माधुरी डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

आर्मी डे भारतात दरवर्षी 15 जानेवारीला लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के. एम. करियप्पा यांना भारतीय सैन्याचा अव्वल कमांडर मानून साजरा करण्यात येतो. फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा 15 जानेवारी 1949  रोजी स्वतंत्र भारताचे पहिले सैन्य प्रमुख बनले. त्यावेळी भारतीय सैन्यात सुमारे २ लाख सैनिक होते.

कोकण भवन मधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या  महिला भोजन कक्षामध्ये या  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टंसिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. शिबीर यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई विभाग अजित न्यायनिरगुणे, मंत्रालयीन अध्यक्ष उमाकांत भुजबळ, सल्लागार दिलीप अहिरे, जिल्हा अध्यक्ष मुंबई उपनगर.बाळासो जाधव, जिल्हा अध्यक्ष ठाणे निलेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांच्या रक्तपेढीने सदर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघरचे रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————————————————————