महापालिका आयुक्तांकडून शहरातील सफाई कामांचा आढावा

नवी मुंबई, 2 मे 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज सकाळी परिमंडळ 2 क्षेत्राचा पाहणी दौरा करून तेथील स्वच्छता तसेच पावसाळीपूर्व साफसफाई कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली विभाग क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्या समवेत विविध ठिकाणी अचानक भेटी दिल्या. शहरातील साफसफाई वेळेत सुरू करण्याचे निर्देश दिले.

पावसाळापूर्व गटारे सफाईची पाहणी करताना गटारे सफाई करून झाल्यानंतर त्यातून काढलेला गाळ गटाराच्या कडेला रस्त्यावर ठेवण्यात येतो. तो सुकल्यानंतर तात्काळ उचलण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या व यामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये असे निर्देश दिले.

कोपरखैरणे व ऐरोली भागात काही दुकानांसमोरील भागात पदपथ व रस्त्यांवर कचरा टाकलेला आढळून आल्याचे लक्षात येताच त्या दुकानदारांना नोटिसा बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच सर्वच दुकानदारांनी कचरा योग्य पध्दतीनेच ठेवावा व कचरागाड्यांमध्ये योग्य प्रकारे द्यावा ही दुकानदारांचीच जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना पुन्हा एकवार करून द्यावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

घणसोली आगाराला भेट

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घणसोली येथील एन.एम.एम.टी. बसडेपोला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यामध्ये बसगाड्यांच्या वेळा, वाहक, चालक यांच्या कामावर येण्याच्या वेळा याची पाहणी केली. त्याचप्रमाणे बसगाड्यांमध्ये जाऊन आतील साफसफाई तसेच सिटस् ची स्थिती याचीही पाहणी केली.

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम तीव्र करा

आगामी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने पावसाळापूर्व नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना कोपरखैरणे व घणसोली विभागात नालेसफाईत मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या प्लास्टिकच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्लास्टिक तात्काळ काढून टाकण्याचे आदेशित करीत प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले.