पक्षादेश न पाळणा-या नगरसेवकांविरूद्ध अपात्रतेची कारवाई सुरु करा!

  • प्रदेश काँग्रेस कमिटीचे भिवंडी काँग्रेस अध्यक्ष व महापालिकेतील गटनेत्यांना आदेश
  • भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस, तीन दिवसांत खुलास करण्याचे आदेश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ५ डिसेंबर २०१९:

आज दिनांक ५ डिसेंबर रोजी झालेल्या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या १८ सदस्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून हा पक्षशिस्तीचा भंग आहे. पक्षाचा आदेश न पाळणा-या सर्व नगरसेवकांविरूद्ध अपात्रतेची कारवाई सुरु करून  आयुक्तांकडे प्रकरण दाखल करावे असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शोएब अशफाक गुड्डू आणि भिवंडी निजामपूर महापालिकतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अन्सारी मो. हलीम मो. हारुन यांना देण्यात आले आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शोएब अशफाक गुड्डू यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडे पूर्ण बहुमत असताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या १८ महापालिका सदस्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले.

भिवंडी निजामपूर महापालिका संदर्भात स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच महापालिकेतील पदांचे वाटप करण्यासंदर्भात आपण आपल्या स्तरावर निर्णय घेऊनही आपण सर्व सदस्यांना एकसंघ ठेवू शकला नाहीत, यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात आपण तीन दिवसांत आपले स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेस कार्यालयास लेखी कळवले नाही तर यासंदर्भात आपले काही म्हणणे नाही असे समजून आपल्याविरोधात योग्य ती कार्यवाही केली जाईल असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. गणेश पाटील यांनी दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

================================================

इतर बातम्यांचाही मागोवा