माझं गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ होतोय; पण…!

  • हेमंत कोळी /अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • दिवाळे, नवी मुंबई, ४ जून २०२३

शेताच्या बांधावर आणि मिठाच्या आगारावर तोऱ्यात उभ्या राहिलेल्या नवी मुंबईला दुसरी मुंबई म्हणून संबोधले जाते. अत्यंत सुनियोजित वसवलेल्या शहरांपैकी एक सुसज्ज व नेटके शहर म्हणून उदयास आलेलं आणि आज देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहराच्या पटावर एक वेगळी ओळख असलेलं नाव म्हणजे नवी मुंबई… शहरांसह गावांचा देखील विकास व्हावा यासाठी सरकारच्या गाव दत्तक योजने अंतर्गत ‘स्मार्ट व्हिलेज’ हि संकल्पना राबवण्यात आली आणि खऱ्या अर्थाने शहरीकरणाच्या आखाड्यात माझं दिवाळे गाव आता ‘स्मार्ट व्हिलेज’च्या दिशेने वाटचाल करत आहे.

हे चांगलं, कि वाईट, हे माहित नाही पण… आज पाहता पाहता नवी मुंबई शहर चहुबाजुंनी विस्तारित होत गेला आहे आणि शहरीकरणाच्या ओघात स्थानिक भूमिपुत्रांची मूळ गाव सुद्धा दिसेनाशी झाली आहेत. हे सर्व डोळ्यादेखत घडत असताना आम्ही मात्र तोंडावर बोट ठेवून पाहत आहोत. पण पुढच्या पिढीचं काय..? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनाला सतावू लागला आहे. इथल्या गावकऱ्यांचा कोणत्याही प्रकल्पाला अथवा विकासाला विरोध नाही. पण, आमच्याच हक्कांच्या जागेवर उभारलेल्या शासकीय कार्यालये, बहुतांश मुख्यालय तसेच मोठमोठ्या प्रकल्पामध्ये स्थानिकांसाठी राखीव रोजगार हमी का नाही? आजवर याविषयी कधीच कोणी आवाज उठवला नाही. या गोष्टीची खंत वाटते.

गावाचा विकास करता करता इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी एकदा तरी पुढाकार घेऊन सांगावं की ज्या ‘स्मार्ट व्हिलेज’ अंतर्गत गावाचा आम्ही कायापालट करत आहोत त्या दिवाळे – बेलापूर विभागात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देऊ असं कधीच कोणी सांगताना दिसत नाहीत. फक्त केलेल्या घोषणेचे भूमिपूजन आणि कालांतराने उदघाटन करण्यासाठी काही पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते पटाईत असतात. पूर्वी गावशिवारात पारंपरिक सणांना वेगळं महत्व होतं. अगदी साध्या पद्धतीने साजरे व्हायचे पण त्याची रंगत कायम आठवणीत असायची.

आता गाव एक शहर झालं आणि वेळेच्या मर्यादेत अडकून पडलं. येथील सण वार एक निमित्त झालं आहे. पण पूर्वीसारखी तशी मज्जा राहिली नाही. एवढं झालंच आहे तर विकास हा झालाच पाहिजे. पण, गावासह इथले सण, उत्सव रूढी परंपरा हि सुद्धा टिकली पाहिजे. गेल्या अनेक पिढया न पिढया मासेमारी करणारा येथील स्थानिक कोळी समाज आज अनेक बाजूंनी संकटात सापडला आहे. मात्र, याची दखल घ्यायला कोणी उभा नाही. सरकार दरबारी पत्र व्यवहार करून देखील वर्षानुवर्ष न्याय मिळत नाही. पूर्वी वर्षाचे बाराही महिने मुबलक प्रमाणात मासे मिळायचे. मात्र, नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाच्या भरावामुळे आणि सुरुंग स्फोटकाच्या आवाजाने दिवाळे – बेलापूर पट्ट्यातील मासेमारी पूर्णपणे धोक्यात आली आहे.

शहराचा विकास होणारचं आहे. पण, इथला स्थानिक मच्छीमार जगला पाहिजे आणि मासेमारी व्यवसाय टिकला पाहिजे. कारण, आजही गावात ८०% कुटुंब हे मासेमारीवर आपला उदरनिर्वाह करता. पण अशा प्रकल्पांमुळे आमचा मूळ व्यवसायचं नाहीसा झाला तर…? तळोजा औधोगिक वसाहतींच्या कारखान्यांमधून आजही दूषित सांडपाणी समुद्रात सोडलं जातं. यामुळे स्थानिक कोळीबांधवांसमोर संकट उभं ठाकलं आहे. अनेकदा कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगताना दिसतात.

समुद्रात वाढत असलेले प्रदूषण, भूगर्भ सर्वेक्षणादरम्यान केले जाणारे स्फोट, सागरी जलवाहतूक तसेच खाडीपुलाचे काम याशिवाय बेकायदा मार्गाने होणारी मासेमारी अशा विविध कारणांमुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. या यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा कोणी कारवाई करताना दिसत नाहीत. मग तुम्हीचं सांगा ना माझं गाव स्मार्ट’ होऊन काय साध्ये होणार आहे. आज गावातील अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत पण गाववाले म्हणून ना प्रथम प्राधान्य आहे ना कुठे आरक्षण आहे. मग, हताश होऊन पुन्हा मासेमारी हाच एक पर्याय ठरलेला….

गावाच्या समोर डोळ्यादेखत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहत आहे. मुद्दा जरी विकासाचा असला तरी, आज स्थानिक कोळीबांधवांच्या रोजगारावर गदा आली आहे. आज अनेक कुटुंब आर्थिक परिस्थीचा सामना करत आहेत. या गोष्टीतून कसं सावरता येईल. यातून काय मार्ग काढता येईल हे विचारात घेऊन उपाययोजना करावी, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. मात्र., या विषयांवर कोणी बोलायला तयार नाही. खरंतर योग्य मार्ग काढून, स्थानिक महिलांसाठी आर्थिक रोजगारासह ज्या काही राज्य सरकारकडून सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा नागरिकांना कसा फायदा होईल हे सर्व लक्षात घेऊन स्थानिक भूमिपुत्रांच्या मुलांसाठी शैक्षणिक हितासाठी लागणाऱ्या सवलती मंजूर करून त्यांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना वेळेत दिल्या गेल्या तर येथील स्थानिक लोंकाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल हे निश्चित…

दरम्यान, नवी मुंबईची भौगोलिक रचना स्पष्ट करताना दिघा ते दिवाळे अशी केली जाते. ठाण्याच्या बाजूने दिघा या गावापासून नवी मुंबई सुरू होते, तर बेलापूरच्या बाजूने दिवाळे गावात या शहराची हद्द संपते. चारही बाजूंनी समुद्राचे खारे पाणी आणि मधोमध २० मीटर उंच असलेल्या टेकडीवर दिवाळे गाव वसले आहे. आता उत्तर बाजूने नगरीकरण झाले आहे, पण तिन्ही बाजूंनी आजही खळखळणारा समुद्र गावाची शान कायम ठेवून आहे.

(लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी संपादक  मंडळ सहमत असतीलच असे नाही)

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL