गणेशोत्सव २०२३ :नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे सुनियोजित आयोजनाविषयी निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 ऑगस्ट 2023

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेशोत्सव व नवरात्रौत्सव अत्यंत उत्साहात मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. उत्सव आयोजन करताना घ्याव्या लागणा-या आवश्यक परवानगीबाबत सूसुत्रता असावी व नागरिकांना त्या सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ऑनलाईन परवानगी प्रणाली, विसर्जन व्यवस्था, कृत्रिम तलाव निर्मिती व इतर सुविधा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्यदिनानंतर विभाग अधिकारी स्तरावर विभागीय क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उदयान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता  शिरिष आरदवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे आणि सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, तुर्भे विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल बोंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव संपन्न होत असून तत्पूर्वी 1 महिना आधीपासून गणेशोत्सवासाठी आवश्यक मंडप, स्टेज परवानगी मिळणेबाबत कार्यवाही सुरु होते. मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार मंडळांना उत्सवासाठी मंडप उभारणेकरिता परवानगी देण्याची नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यात प्रथमत: विकसित केलेली ई सेवा संगणक प्रणाली लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या प्रणालीव्दारे पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन या विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्रासह मंडळांनी अर्ज दाखल केल्यानंतर विभाग कार्यालयामार्फत जलद तपासणी करुन विनाविलंब परवानगी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी परिमंडळ विभागप्रमुखांसह विभाग अधिकारी यांना दिले. लेखी परवानगी प्राप्त्‍ झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मंडप उभारणी केली जाऊ नये असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

श्रीगणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी विसर्जनस्थळी कोणत्याही प्रकारची गर्दी न होता सुव्यवस्थित रितीने व्हावे या दृष्टीने मागील वर्षी 22 मुख्य विसर्जन स्थळांप्रमाणेच मुर्तीची विभागवार संख्या लक्षात घेऊन 134 इतक्या मोठया प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन या संख्येत वाढ करण्याची गरज आहे काय याची तपासणी करुन आवश्यकता असल्यास अभियांत्रिकी विभागास कळविण्यात यावे असे आयुक्तांमार्फत विभाग अधिका-यांना सूचित करण्यात आले.

विसर्जन स्थळावरील बॅरेकेटींग, विदयुत व्यवस्था, पर्यायी जनरेटर व्यवस्था, विसर्जनासाठी तराफे व्यवस्था, श्रीमुर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक नियुक्ती, कृत्रिम तलावांच्या ठिकाणची व्यवस्था, मुख्य विसर्जन स्थळांवर स्टेज व ध्वनीक्षेपक व्यवस्था, कृत्रिम व नैसर्गिक अशा सर्व विसर्जन स्थळांवर सुके व ओले निर्माल्य कलश व्यवस्था, निर्माल्य वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था, मुख्य विसर्जनस्थळी वैदयकिय पथक व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था अशा सर्वच बाबींचा आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला.

उदयान विभागाने सर्व विसर्जन स्थळांकडे जाणा-या मार्गांची प्रत्यक्ष पहाणी करून विसर्जन स्थळाकडे जाणा-या मूर्तींना अडथळा होणार नाही अशाप्रकारे वृक्ष छाटणी करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

नवी मुंबई महानगरपालिका सुव्यवस्थित रितीने गणेशोत्सव आयोजनासाठी पोलीस विभागासह सज्ज असून मंडळांनी ऑनलाईन परवानगी प्रणालीचा उपयोग करुन घ्यावा व नागरिकांनी उत्सवाच्या उत्तम आयोजनात संपूर्ण सहकार्य करावे तसेच या अनुषँगाने काही सूचना असल्यास नजिकच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

========================================================

========================================================