नवी मुंबईत इमारतीचे स्लॅब कोसळले, 2 ठार 6 गंभीर जखमी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 ऑगस्ट 2023

नवी मुंबईमधील नेरुळ सेक्टर 6 इथल्या तुलशी दर्शन  या इमारतीचे काही  मजल्यांचा काही भाग आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोसळला. कोसळलेला भाग इमारतीच्या आतील असून या दुर्घटनेत २ रहिवाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या आपतकालीन विभागाने रात्री उशिरा दिली आहे.  या अपघातात ६ रहिवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर नेरूळ इथल्या डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजाळे गेल्याची माहिती आपतकालीन विभागाने दिली आहे.

घटनास्थळी रेस्क्यु ऑपरेशन झाले असून जेसीबी च्या साहाय्याने पडलेला मलाबा काढण्याचे काम चालू आहे.सदर बिल्डिंग मधील रहिवाशी यांना नेरुळ येथील अहिल्याबाई होळकर समाज मंदिर हॉल संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले आहे . मृतांमध्ये बाबाजी शिंगाडे व एका मजदुराचा समावेश आहे.

दरम्यान, नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न कमालीचा चिघळला आहे. शहरात सिडको निर्मित तसेच अन्य रहिवाशी इमारतींची अवस्था अतिशय बिकट आहे. छताचे प्लास्टर अंगावर कोसळणे, भिंतींना तडे जाणे, पावसाळ्यात सतत पाणी झिरपून छप्पर कमकुवत झाल्याचे उघडकीस आले आहे. या जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. त्यावर अद्याप ठोस तोडगा निघत नसल्यामुळे नागरिक जीव मुठीत धरूनच या जीर्ण इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहे.

नवी मुंबई महापालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची संख्या जाहीर करते. मात्र  जोपर्यंत या जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत अशाप्रकारच्या दुर्घटना घडत राहतील, अशी भिती निर्माण झाली आहे.

========================================================