नमुंमपा अभियंता स्वप्निल देसाई यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 ऑक्टोबर 2023

नवी मुंबई महानगरपालिकेचे अभियंता स्वप्निल देसाई यांचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलनिःस्सारण व्यवस्थापनावरील शोधनिबंध इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (IRJET) यासारख्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला असून त्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचेसह सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी यांचे कौतुक केले आहे तसेच त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदनही करण्यात येत आहे.
जल व्यवस्थापन आणि मलनिःस्सारण व्यवस्थापन या क्षेत्रातील 15 हून अधिक वर्षांचा अनुभव असणारे अभियंता स्वप्निल देसाई यांच्या अनुभवाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेत विविध कामांमध्ये होत आहे. अत्यंत अभ्यासूपणे व कर्तव्यनिष्ठेने उत्तम कामगिरी करणारा अभियंता ही त्यांची ओळख असून त्यांनी 20 हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे  व आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले आहेत.

ही बातमी वाचा : निवडणुकीचे पडघम वाजले; पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या स्वप्निल देसाई यांनी एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक. केलेले असून सद्यस्थितीत ते पर्यावरण अभियांत्रिकी ( सांडपाणी) या विषयात पीएचडी करीत आहेत.
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया, इन्स्टिट्यूट फॉर इंजीनियरिंग रिसर्च अँड पब्लिकेशन, इंडियन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स, आयएसआरपी मलेशिया, इंटरनॅशनल सोलार इंजीनियरिंग सोसायटी जर्मनी अशा अनेक प्रतिथयश संस्थांचे ते सन्माननीय सदस्य असून त्यांना आय कॅन फाऊंडेशनकडून नॅशनल एज्युकेशन ब्रिलियन्स  एवॉर्ड, आयएनएससी बंगलोर यांच्याकडून रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड, एसआयएसआरपी, चेन्नई यांच्यातर्फे इनोव्हेटिव्ह रिसर्चर अँड डेडिकेटेड एक्सलंट प्रोफेशनल अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

ही बातमी वाचा : प्रभारी आयुक्तांकडून नवी मुंबईतील नागरी कामांचा आढावा

सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत नवनवे तंत्रज्ञान शिकत राहणे ही त्यांची अंगभूत आवड असून त्यादृष्टीने ते सांडपाणी प्रक्रिया आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनात्मक उच्च प्रशिक्षण सातत्याने घेत आलेले आहेत.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक ख्यातनाम संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे अनेक शोधनिबंध यापूर्वीही प्रसिद्ध झाले असून आता इंटरनॅशनल रिसर्च जनरल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (IRJET) या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेमार्फत स्वप्निल देसाई यांचा, ‘नवी मुंबई, महाराष्ट्र येथे अमृत मिशन अंतर्गत औद्योगिक उपयोगी दर्जाचे पाणी निर्मिती करण्यासाठी अल्ट्रा फिल्टरेशन टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचे डिझाईन आणि व्यवहार्यता यांचे विश्लेषण’ या विषयावरील शोधनिबंध  प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या या गुणवत्तापूर्ण यशामुळे नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या नावलौकिकातही लक्षणीय भर पडलेली आहे. त्याबद्दल शहर अभियंता संजय देसाई यांनीही कौतुक केले आहे.

========================================================