सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 24  फेब्रुवारी 2024

प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे,असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) म्हाडा सदनिका सोडत 2023-24 कोंकण विभागातील 5 हजार  311 सदनिकांच्या विक्रीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, ठाणे येथील आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात केले.

यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर,माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीव जयस्वाल, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अन्न, वस्त्र व निवारा ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान आवास योजना ही शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात राबविली जाते. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट व मध्यम उपत्न गटातील लोकांना या सदनिकांचे सोडतीद्वारे वाटप करण्यात येते. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपल्याला केंद्राकडून मोठया प्रमाणात मदत मिळत आहे. राज्य सरकारकडून घरे मोठया प्रमाणावर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गिरणी कामगारांना देखील घरे देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून सर्व कामकाज पारदर्शक पध्दतीने चालले आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की,  आपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून आता अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात आणि राज्यात सर्वांगीण विकास होताना दिसतोय. शासनाकडून देण्यात येणारी ही सर्व घरे वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत. जे वेळेत घर पूर्ण करतील त्यांना सन्मानित करण्यात येईल तर जे काम वेळेत काम करणार नाहीत त्यांना निश्चितच दंड आकारण्यात येईल.

========================================================


========================================================

========================================================