क्रीडा अधिकारी  रेवप्पा गुरव यांची विश्वचषकासाठी भारतीय शूटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 फेब्रुवारी 2024 

नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी  रेवप्पा गुरव यांची 2 व 3 मार्च रोजी इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणाऱ्या आयएसबीएफ शूटिंगबॉल वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय शूटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
शूटिंगबॉल या मान्यताप्राप्त खेळातील नामांकित खेळाडू म्हणून सुपरिचित असणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी यापूर्वी अनेक वर्ष भारतीय शूटिंगबॉल संघात प्रतिनिधित्व केले असून भारतीय शूटिंगबॉल संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे.

बातमी वाचा : मालमत्ताकर वसूलीच्या उद्दीष्टपूर्तीसाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांची आढावा बैठकीतून आखणी

नवी मुंबई महानगरपालिकेचा शूटिंगबॉल संघ बांधण्यात यांची महत्त्वाची भूमिका आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये या संघासह सहभागी होऊन अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सांघिक पारितोषिके या संघाने तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून रेवप्पा गुरव यांनी पटकाविलेली आहेत. शूटिंगबॉल खेळात पंचींग या अतिशय महत्त्वाच्या स्थानावरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून  रेवप्पा गुरव यांचा नावलौकिक असून त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत उत्कृष्ट पंचर म्हणून असंख्य पारितोषिके पटकाविलेली आहेत.

बातमी वाचा : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान वाशीत ‘उत्सव मराठी भाषेचा, सुलेखन संस्कृतीचा’

2 व 3 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या शूटिंगबॉल वर्ल्डकप 2024 स्पर्धेमध्ये कॅनडा, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, यूएई, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेपाळ यांच्यासह यजमान भारत देशाचा संघ सहभागी होत असून शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने देशातील अनेक उत्तम खेळाडूंमधून रेवप्पा गुरव यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांच्यातील गुण हेरून निवड केलेली आहे.


रेवप्पा गुरव आता भारतीय शूटिंगबॉल संघात विश्वचषक जिंकण्याची उमेद निर्माण करणार आहेत, त्यांची त्या दृष्टीने तयारी करून घेणार आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे तसेच त्यांना आणि भारतीय संघाला शूटिंगबॉलचा विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात येत आहेत.

========================================================


========================================================

========================================================