महिला बचत गटांच्या यशोगाथा पुस्तकरुपात

मुंबई,25 मे 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसेवी बचत गटांनी केलेल्या विविध उपक्रमांच्या यशोगाथांचे पुस्तकरुपात संकलन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या हस्ते आज करण्यात आले. बचत गटांनी राज्यात ग्रामीण अर्थक्रांती घडवून आणल्याचे मल्लिक म्हणाले.

मंत्रालयात आज जागतिक बँकेचे पथक प्रमुख परमेश शहा, लक्ष्मी दुर्गा, मेघा फणसळकर यांनी मुख्य सचिवांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपसंचालक रणधीर सोमवंशी, रामदास धुमाळ आदी उपस्थित होते.

जागतिक बँकेच्या पथकाने राज्यातील गडचिरोली, गोंदिया, वर्धा येथे भेट देवून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करुन  समाधान व्यक्त केले.

  • राज्यात 1 लाख 60 हजार बचत गट

या अभियानांतर्गत राज्यात 1 लाख 60 हजार बचत गट कार्यरत असून 6 हजार ग्रामसंघ तयार करण्यात आले आहे. बचत गटांना 1800 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 14 जिल्हे व 137 तालुक्यात परिणामकारपणे  अभियानाचे काम सुरु आहे.