आता पुढे काय ?…

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5  मे 2024

अपेक्षेप्रमाणे ठाणे लोकसभेची जागा भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सोडली आणि शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाली. महायुतीच्या या निर्णयाचा मोठा फटका भाजपचे माजी खा. संजीव नाईक यांना बसला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा तिढा ताणला गेलेला असताना माजी खा. संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात गाठीभेटींचा धडाका लावून दबावाचे राजकारण केले होते. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे काहीसे चित्र निर्माण केले गेले. मात्र महायुतीचा निर्णय वेगळाच ठरला आणि अपेक्षेप्रमाणे संजीव नाईक यांची उमेदवारी नाकारली गेली.

भाजपला विशेषतः संजीव नाईक यांना तिकीट न मिळाल्यामुळे साहजिक ते नाराज होणे अपेक्षित आहे. अशावेळी इच्छुक उमेदवार स्वतः नाराजी व्यक्त करून पक्ष नेतृत्वाला आव्हान देत नाही तर कार्यकर्त्यांच्या विरोधाच्या माध्यमातून नाराजीचा सूर वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचा असतो, तसा पोहोचविण्यात संजीव नाईक काहीसे यशस्वी ठरले आहेत, मात्र त्याचा अधिक काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहीत होते. म्हणूनच शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहून परिपक्वतेची जाणीव करून दिली.

LEAD : भाजपची सावध खेळी

उमेदवारी नाकारली हा संजीव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण गेली १० वर्षे सक्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर गेलेल्या संजीव नाईक यांना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संधी मिळाली असती. मात्र ठाण्यातील नाईक घराण्याचे राजकीय वर्चस्व आणि त्यासोबत निर्माण झालेली विरोधकांची फळी यामुळे पक्षांतर्गत तसेच पक्षाच्या बाहेरीलही विरोधक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. हीच बाब त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारी ठरल्याचे बोलले जात आहे.

राजन विचारे यांना आतापर्यंत मोदी लाटेचा आणि एकसंध शिवसेनेचा फायदा मिळाला होता. मात्र यावेळी लोकसभेची लढाई नक्कीच संघर्षाची असणार आहे. त्यात गणेश नाईक आणि त्यांचे समर्थकांनी समंजसपणा दाखवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यास हातभार लावल्यास त्याचे चांगले फलित नाईकांना पक्षाकडून मिळण्याची शक्यता अधिक. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाईकांवरील विश्वास वाढेल, जो गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक यांच्या राजकीय वाटचालीसाठी सहाय्यभूत ठरेल, असे मानण्यास हरकत नाही.

NEWS : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 43 उमेदवारांचे अर्ज दाखल

राजकारणाची दिशा कधी आणि कशी बदलेल हे येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत राजकारणात संयम आणि योग्य वेळ महत्वाची असते आणि प्रवाहासोबत काही काळ पोहोण्यातच शहाणपण आहे. एवढा संयम नाईक कुटंब दाखवेल आणि जेव्हा संधी मिळेल, तेव्हा राजकीय मुत्सद्दीपणा दाखवण्यासाठी लागणारा प्रचंड अनुभवही गाठीशी आहे. तोच अनुभव आणि संयमपणा संजीव नाईकांना भविष्यात उपयुक्त ठरेल हे नक्की.

========================================================


========================================================