इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहनांतर्गत बजाज ऑटोला ६६ कोटी ८२ लाख रुपये

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 27 ऑक्टोबर 2026

 महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-२०२१ च्या अंतर्गत बजाज ऑटो लिमिटेड यांना विशेष बाब म्हणून ६६ कोटी ८२ लाख रूपयांचा अतिरिक्त निधी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ अंतर्गत नोंदणी होणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांना वाहन संवर्गनिहाय प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे. हा प्रोत्साहन निधी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांद्वारे वाहन खरेदीदारांना वाहन विक्रीच्यावेळी देण्यात येतो.

क्लिक करा : मानसिकतेविरूध्द कायद्याची साथ महत्त्वाची

या निधीची मागणी उत्पादकांकडून शासनाकडे केली जाते. या धोरणांतर्गत एक लाख दुचाकी वाहनांची राज्यस्तरीय कमाल मर्यादा राज्यातील सर्व उत्पादकांच्या एकत्रित विक्रीतून याआधीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त ६६,८१७ वाहनांच्या प्रोत्साहनासाठीच्या निधीची मागणी बजाज कंपनीतर्फे करण्यात आली होती.

या कंपनीचे औद्योगिक क्षेत्रातील योगदान व गुंतवणूक यांची दखल घेऊन महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-२०२१ अंतर्गत विशेष बाब म्हणून अशी ६६ कोटी ८२ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यास मान्यता देण्यात आली.