भारत अमेरिकेचा खरा मित्र

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2017:

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असल्याचे सांगत ट्रम्प यांनी मोदींनी अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी यांनीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.

ट्रम्प आणि माझ्यामध्ये अतिशय चांगली चर्चा झाली. आगामी काळात अनेक महत्वांच्या मुद्द्यांवर अमेरिका आणि भारताला एकत्र काम करायचे असल्याचे ट्रम्प  म्हणाल्याचे मोदी यांनी ट्विट करून सांगितले.

अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी चौथ्याच दिवशीच मोदींशी फोनवरून चर्चा करून आगामी काळात भारत हा अमेरिकेच्या अतिशय जवळचा देश असल्याचे संकेत दिले आहे.

20 जनेवारी रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आतापर्यंत चार देशांच्या राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी हे पाचवे नेते ठरले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी 21 जानेवारी रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रडेऊ आणि मेक्सिकोचे पंतप्रधान पेना निएटो यांची चर्चा केली. त्यानंतर रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु  आणि सोमवारी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह अल सिसि यांच्यांशी फोनवरून चर्चा केली.

अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या विजय मिळविल्यानंतर जगभरातील पाच नेत्यांनी त्यांना लगेचच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी रशिया, चीन, जपान आदी देशांच्या नेत्यांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातील वेगाने विस्तारणाऱ्या भारताला अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते.