रिलायन्स कम्युनिकेशन्सचे 72 टॉवर जप्त

ठाणे, 23मार्च 2017/AV News Bureau:

मालमत्ता कराची 18.72 कोटी रूपयांची थकबाकी न भरल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने शहरातील रिलायन्स कम्यनिकेशन्सचे 80 पैकी एकूण 72 टॉवर सील केले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशासनंतर आज ही कारवाई करण्यात आली.

ठाण्यात मे. रिलायन्स इन्फ्राटेल्स/रिलायन्स कम्युनिकेशन्सचे एकूण 80 मोबाइल टॉवर्स अस्तित्वात आहेत. या टॉवर्सच्या मालमत्ता कराची थकबाकी सन 2011-2012 सालापासून प्रलंबित आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायलयानेही ठाणे महापालिकेची बाजू कायदेशीर असल्याचे मान्य करून रिलायन्स कम्यनिकेशन्सची याचिका फेटाळली होती.

महापालिकेकडून मे. रिलायन्स इन्फ्राटेल्स/रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्याकडून थकित मालमत्ता कराची रक्कम भरण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तरीही कंपनीने थकित रक्कम भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मे. रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे सर्व मोबाईल टॉवर्स ताब्यात घेवून सील करण्याचे आदेश दिले होते.