सायरा बानो, जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना पुरस्कार

राजकपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा

मुंबई, 19 एप्रिल 2017 /AV News Bureau:

राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सायरा बानो यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी प्रसिध्द अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा केली.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले,  तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.