अविरत वाटचाल विशेष : कोकण रेल्वेमार्गावर नवीन 92 बोगदे

दुपदरीकरणासाठी नवीन बोगदे बांधणे गरजेचे असल्याचे मत 

स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल न्यूज

22 एप्रिल 2017/AV News Bureau:

कोकणातील नैसर्गिक आव्हानांना तोंड देत मोठ्या दिमाखात धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या पहिल्या टप्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी आता जून्या बोगद्यांच्याच शेजारी सुमारे 92 नवीन बोगदे बांधण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. हे काम अतिशय खर्चिक असले तरी नवीन बोगद्यांशिवाय दुपदरीकरणाचे काम पूर्ण होणार नाही,असे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

1998 साली कोकण रेल्वे सुरू झाली. आतापर्यंत केवळ रस्ते मार्गानेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोकण रेल्वेमुळे प्रवासासाठी नवीन आणि वेगवान पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या केवळ एकाच रेल्वे मार्गावरून कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या गाड्या धावतात. शिवाय मालवाहतूक करणारे ट्रक नेणारी रो रो ही सेवाही सुरु असल्यामुळे या एकाच मार्गावर कमालाचा ताण पडत आहे. यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झालं आहे. रोहा ते वीर या 46 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पहिल्या टप्यात सुरू करण्यात आले आहे.

 

दुपदरीकरणासाठी नवीन बोगदे बांधणे गरजेचे

  • कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 92 बोगदे आहेत. दुपदीकरणात बोगदे आणि पुल हे मोठे आव्हान आहे. बोगद्यांमध्ये  एकच मार्ग असल्यामुळे दुपदीकरणादरम्यान अडचण निर्माण होणार आहे.  सध्या असलेले बोगदे रूंदीला कमी आहेत. त्यामुळे त्याच बोगद्यांमधून दुसरा रेल्वे मार्ग काढणे शक्य नाही. यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील विद्यमान बोगद्यांच्या शेजारीच नव्याने बोगदे उभारण्याचा विचार सुरू झाला आहे. सध्या असलेल्या बोगद्यांच्या बाजूलाच 25 ते 30 मीटर अंतरावर नवीन बोगदे उभारले जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली.
  • कोकण रेल्वे मार्गावर सध्या असणा-या बोगद्यांमध्ये रुंदीकरणाचे काम करता येणार नाही. त्याच बोगद्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला तर बोगद्यांच्या बांधकामालाच धक्का बसेल, त्यामुळे नवीन बोगदे उभारण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
  •  नवीन बोगदे उभारण्याचे काम अतिशय जिकरीचे आणि खर्चिकही आहे. मात्र भविष्याचा विचार करता आणि कोकण रेल्वे मार्गाचा एकूणच विस्तार लक्षात घेता दुपदरीकरणाचे काम करताना नवीन बोगदे उभारणीचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.