दोन वर्षांत मुंबईतील सर्व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाचे “ई भूमिपूजन” पार पडले

मुंबई, 22 एप्रिल 2017/AV News Bureau:

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 195 चांळींच्या कामाचे आज भूमीपुजन पार पडले. या चाळींच्या पुर्नविकासात तेथे राहणाऱ्या रहिवाशांना ५०० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे. बीडीडी चाळींप्रमाणेच पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी येथील जांबोरी मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत प्रत्येक अधिवेशनात चर्चा व्हायची प्रत्यक्षात काहीच घडत नव्हते. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने आणि चाळीच्या जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा असल्याने पुनर्विकासाकडे दुर्लक्ष झाले आता या सरकारने प्राधान्याने लक्ष घालून पुनर्विकासाच्या कामाला गती दिली आहे. या पुनर्विकासात 68 टक्के जमीन ही रहिवाशांसाठी तर उर्वरित 32 टक्के जमीन विक्रीसाठी वापरली जाणार आहे. या नव्या इमारती देशातील सर्वोत्तम इमारती असतील. पुढच्या 50 वर्षांचा विचार करून इमारतींचे उत्तम डिझाईन तयार केलेले आहे. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

काही मुद्दे

  • मुंबईमध्ये वरळी, ना.म.जोशी मार्ग, नायगाव या ठिकाणी राज्य शासनाच्या जागेवर व शिवडी येथे मुंबई बंदर न्यासाच्या जागेवर अशा एकुण ९२.७० एकरवर २०८ चाळी आहेत.
  • वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ, नायगाव येथील चाळीतील प्रत्येक इमारतीमध्ये ८० रहिवाशी गाळे प्रत्येकी १६० चौरस फूट चटई क्षेत्रफळ  याप्रमाणे एकूण १६ हजार २०३ गाळे आहेत.
  • बीडीडी चाळींच्या पुर्नविकासासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची सुकाणु अभिकरण (नोडल एजन्सी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ना.म.जोशी मार्ग येथी चाळीच्या पुर्नविकासासाठी शापुरजी पालनजी व नायगांव येथील चाळीच्या पुर्नविकासासाठी लार्सन ऍन्ड टुब्रो या कंत्रादारांची निवड करण्यात आली आहे.
  • वरळी येथील चाळींच्या पुनर्विकास निविदा स्तरावर आहे.
  • या प्रकल्पातून १३,६०० अतिरिक्त सदनिका उपलब्ध होणार असल्याचेही वायकर यांनी अधिवेशनादरम्यान सांगितले होते.