सीएसएमटीजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळला 5 ठार, 36 जखमी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई , १४ मा्र्च २०१९ :

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणारा हिमाला ब्रिज आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. अतिशय वर्दळीच्यावेळीस घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 36 जखमी आहेत.त्यातील दोन जण अत्यवस्थ असल्याचे कळते. संध्याकाळी कार्यालये सुटण्याची वेळ असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू असतानाच पूल कोसळल्यामुळे पुलाच्या ढिगा-याखाली अनेकजण अडकले असण्याची शक्यता आहे.

  • ब्रिज कोसळून झालेल्या या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे अपूर्वा प्रभू(35), रंजना तांबे(40), झाहीद खान(32), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५) असून आणखी एका अनोखळी महिलेचा समावेश आहे.

हा ब्रिज सीएसएमटी येथील फलाट क्रमांक 1 आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळील भागाला जोडणारा आहे. ज्यावेळी ब्रिजचा काही भाग कोसळला त्यावेळी या पूलावर पादचा-यांची गर्दी होती. तसेच ब्रिजच्या खालूनही वाहने जात होती. सर्व जखमींना तातडीने जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, जे.जे. आणि सायन रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली आणि यावेळी नागरिकांनीही मदतकार्यासाठी धाव घेतली.