उत्तम आरोग्यसेवेसाठी ट्रॅकिंग सिस्टम सुरु करा

भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत जाधव यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ९ डिसेंबर २०२०

नवी मुंबईकरांसाठी उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्यविषयक ट्रॅकिंग सिस्टीम चालू करावी,अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. या मागणीला महापालिका आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती भरत जाधव यांनी दिली.

अशा प्रकारची प्रणाली प्रगत युरोपियन देशांमध्ये कार्यरत असून त्या माध्यमातून एखाद्या नागरिकाने केलेले रक्तदान, प्लाजमादान, प्लेटलेट्सदान किंवा अवयवदान याची माहिती पुढे कोणत्या रुग्णालया मार्फत कोणत्या रूग्णांना देण्यात आली याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध होते. जेणेकरून दान करणाऱ्या व्यक्तीला आपण केलेले दान व लाभ मिळालेल्या रुग्णाला आपणास मिळालेले योगदान याबाबतची पारदर्शकता या प्रणालीतून विकसित होते. ही ट्रॅकिंग सिस्टम प्रणाली महानगरपालिकेने चालू केल्यास देशात व राज्यात पहिली एकमेव महानगरपालिका होईल, असे भरत जाधव यांनी सांगितले.

या ट्रॅकिंग प्रणालीमुळे देशा समोर व राज्या समोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करण्याचे कार्य व दिशा देण्याचे कार्य महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे दान केलेल्या व्यक्तीलाही एक प्रकारचे वेगळे समाधान मिळाल्या कारणाने दान करण्यास अतिरिक्त उत्साह प्रेरणा व आपुलकी निर्माण होऊन या मुळे जास्त दानकार्य करण्यात प्रेरणा मिळेल. असे भरत जाधव यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

=====================================================

  • मागील बातम्यांचा मागोवा

सीवुडमधील कोरोना योध्यांना नव्या कोऱ्या स्कूटींची भेट