मी राजीनामा देणार नाही

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता

मुंबई, 4 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

मुंबईतील ताडदेवच्या एसआरए घोटाळा प्रकरणाच्या आरोपांमुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची डोकेदुखी वाढली आहे. प्रकाश मेहता यांच्या राजिनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही सभागृहांचे कामकाज आज वारंवार बंद पाडले. जोपर्यंत मुख्यमंत्री प्रकाश मेहतांचा राजिनामा घेत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेत विधान भवनाच्या आवारात सरकारविरोधी घोषणा दिल्या. तर विरोधकांची मागणी व्यवहार्य नसून आपण मंत्रीपदाचा राजिनामा देणार नसल्याचे प्रकाश मेहता यांनी सांगितले.

ताडदेवच्या एम.पी.मील मधील एसआरए घोटाळा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी गेल्या तीन चार दिवसांपासून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान,याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.