फिल्म डिव्हिजनच्या ‘रागोत्सव’मधून शास्त्रीय संगीतातील दुर्मिळ माहितीपटांचा अनमोल नजराणा रसिकांच्या भेटीला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 14 जुलै 2020

फिल्म डिव्हिजनच्यावतीने शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलावंताच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या दुर्मिळ माहितीपटांचा खजिना ‘रागोत्सव…सेलिब्रेशन ऑफ मान्सून’ या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीद्वारे रसिकांसाठी सादर होतो आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या वैभवशाली परंपरेतील अनमोल ठेवा असणाऱ्या काही निवडक माहितीपटांचा हा महोत्सव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या फिल्म डिव्हिजनवतीने 14 ते 16 जुलै 2020 या तीन दिवसांमध्ये ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे. या महोत्सवातील माहितीपटांमध्ये उस्ताद अल्लाउद्दीन खाँ, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, उस्ताद अहमद जान थिरकवा, उस्ताद अल्ला रखाँ, पंडित रवी शंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खाँ, पंडित रामनारायण, पंडित शिवकुमार शर्मा, शेख चिन्ना मौलाना या संगीत क्षेत्रातील महान कलाकारांच्या कार्याचा, त्यांच्या योगदानाचा आलेख मांडणाऱ्या चित्रफिती आहेत. संगीतप्रेमींसाठी ही अनोखी आणि दुर्मिळ संधी आहे, यातले काही चरित्रपट हे 50 वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेले आहेत. फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावर अर्थात www.filmsdivision.org येथे तसेच संस्थेच्या यू ट्यूब चॅनेलवर 14 ते 16 या कालावधीत हे माहितीपट मोफत प्रसारित केले जाणार आहेत.

फार पूर्वीपासून संगीत संयोजनामध्ये मोठ्या कल्पकतेने अनेक वाद्यांचा खुबीने वापर केला गेला आहे. अशा काही प्रमुख वाद्यांबद्दल त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दलची रोचक माहिती देणाऱ्या ‘भारतीय संगीत – वाद्ये’ (11मि. /1952/भास्कर राव) या संगीतवाद्याने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे. रागोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकाहून एक सुरेख माहितीपदाचा खजिना रिता होणार आहे. संगीताची ओढ एका 8 वर्षांच्या मुलाला त्याच्या गावातील घरापासून त्यावेळच्या पूर्व कलकत्ता( आत्ताच्या बांगलादेश) येथे कशी घेऊन येते आणि हा मुलगा पुढे त्याच्या मेहनतीच्या आणि अंगभूत कलेच्या जोरावर थोर संगीतकार कसा होतो याचा साक्षीदार होण्याची संधी म्हणजे उस्ताद अलाउद्दीन खाँ साहेबांवरील ‘बाबा’ (15मि. min./1976/एन.डी.केळुसरकर) हा माहितीपट. 50 वर्षांपूर्वीची निर्मिती असलेली आणि तबलावादनातले माऊंट ऐव्हरेस्ट असं ज्यांना संबोधले जाते त्यांच्यावरील ‘अहमद जान खिरकवा’ हा दुर्मिळ कृष्णधवल माहितीपट केवळ अविस्मरणीय आहे. हा माहितीपट प्रेक्षकांना एका वेगळ्या काळात घेऊन जाईल. सनई या वाद्याला नवी उंची प्राप्त करुन देणारे महान कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, त्यांच्यावरील माहितीपट (19 मि./2007/दिनेश प्रभाकर) म्हणजे अनोखी पर्वणी आहे. ज्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा दुवा असे संबोधले जाते असे जगविख्यात संतूरवादक पंडित रवी शंकर यांचे कानाचे पारणे फेडणारे वादन सोबत भारतीय गुरूकुल परंपरा, संगीत साधना याविषयीचे विचार ऐकण्याची संधी ‘मोमेंट्स विथ मास्टरो’ या माहितीपटातून मिळणार आहे. (18मि /1970/प्रमोद पती). प्रामुख्याने दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये तर काही हिंदू विवाहांमध्ये वाजवले जाणारे वाद्य म्हणजे नादस्वरम् या वाद्यावर हुकुमत असलेले शेख चिन्ना मौलाना यांच्यावरील माहितीपट एक अनुभूती म्हणून पाहायला हवा. याशिवाय सुप्रसिद्ध दिग्ददर्शक श्याम बेनेगल यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीची पावती देणारा ‘श्रृती आणि भारतीय संगीताचे सौंदर्य’ हा 14 मिनिटांचा माहितीपट उत्तम दस्तावेज आहे.

रागोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे गुरू/ वडील तसेच तबलावादनातील एका स्वतंत्र विद्यापीठ मानले जाणारे उस्ताद अल्ला रखाँ यांच्यावरील माहितीपट आहे. ज्यांचे नाव सारंगीसोबत कायमचे जोडले गेले आहे असे पंडित रामनारायण यांच्यावरील माहितीपट आणि गेल्या 6 दशकांहून अधिक काळ ज्यांच्या बासरीच्या सुरांनी रसिकांना अक्षरशः भुरळ पाडली आहे असे, पंडित हरिप्रसार चौरसिया यांच्यावरील ‘बांसरीगुरू’ हा माहितीपट सादर होणार आहे. यासोबत मृदुंग या वाद्याला वाहिलेला ‘ताल आणि रिदम-मृदंगम्’ तर भारतातील विविध भागात वापरल्या जाणाऱ्या तबलावर्गीय वाद्यांचा आढावा घेणारा विशेष माहितीपटही आहे.

रागोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांची सुरेख कलाकृती आणि सुप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या सांगितिक प्रवासाची वाटचाल कथन करणारा माहितीपट आहे. यासह जगाला सरोद या वाद्याची ओळख करून देणाऱ्या घराण्याचा वारसा प्राप्त झालेले महान सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्यावरील गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट आहे. साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त असलेले बासरीवादक, देश-विदेशात नावाजलेले पंडित रोणू मुजुमदार यांच्यावरील ‘बांसुरीवाला’ हा माहितीपटाने महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीची सांगता होईल.

पावसाच्या बरसत्या सरींचा आनंद द्विगुणित करणारा ‘रागोत्सव’ संगीतप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरेल असा विश्वास फिल्म डिव्हिजनच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. या माहितीपटांचा आस्वाद घेण्यासाठी www.filmsdivision.org या संकेतस्थळाला भेट द्या.प्रत्येक दिवशी 24 तासांसाठी माहितीपट लाइव्ह सुरू असतील तसेच फिल्म डिव्हिजनच्या यू ट्यूब चॅनेलवरही ते मोफत पाहता येतील.
अधिक माहितीसाठी –फिल्म डिव्हिजन
022-23522252/ 09004035366
publicity@filmsdivision.org

===============================

  • इतर बातम्यांचाही मागोवा