नवी मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनासाठी 156 कृत्रिम विसर्जन तलाव

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिका,पोलीस विभाग सज्ज

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 सप्टेंबर 2021:

कोविड 19 च्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा गणेशोत्सव कोविड सुरक्षा नियमावलीच्या कक्षेत साजरा व्हावा याकडे लक्ष देण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे. गणेशोत्सवामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवून गणेशोत्सव आरोग्यत्सव स्वरूपात साजरा करण्याविषयी मंडळांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. गणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी येतील हे पहावे व तशा प्रकारच्या सूचना नागरिकांप्रमाणेच गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही द्याव्यात अशी सूचनाही आयुक्त बांगर यांनी केली आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने मागील वर्षी 22 पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळांच्या जोडीला एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची सर्व विभागांमध्ये निर्मिती करण्यात आली होती. यावर्षी नागरिकांना अधिक सोयीचे होईल अशा नवीन 21 कृत्रिम तलावांची वाढ करीत एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यात येणार आहेत. ही कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीची कामे गणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण असावीत. नागरिकांच्या माहितीसाठी या विसर्जन तलावांच्या ठिकाणांची माहिती फ्लेक्स होर्डींगव्दारे तसेच सोशल मिडियाच्या विविध माध्यमांतून नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी असेही निर्देश आयुक्तांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले आहेत.

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन व परिमंडळ 1 उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 उपआयुक्त अमरिश पटनिगेरे, शहर अभियंता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, अशोक मढवी, संध्या अंबादे आणि सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता तसेच सहा. पोलीस आयुक्त गजानन राठोड व विनायक वस्त आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी असे सूचित करण्यात आले आहे.

120 सार्वजनिक मंडळांना मंडप उभारणी परवानगी

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप उभारणी करण्यासाठी मंडळांना आवश्यक परवानगी मिळणे सोयीचे जावे याकरिता 24 जुलैपासूनच www.rtsnmmconline.com या वेबपोर्टलवर विशेष सुविधा निर्माण करून देण्यात आली होती. त्यामध्ये अखेरच्या 31 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत 133 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 120 मंडळांनी अर्जासह सर्व कागदपत्रे जोडल्याने त्यांना मंडप उभारणी परवानगी देण्यात आलेली आहे. सदर परवानगीशिवाय कोणीही मंडपाची उभारणी सुरू करू नये असे यापूर्वीच महानगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आले असून सदर परवानगीची प्रत मंडपात दिसेल अशा प्रकारे प्रदर्शित करण्याच्या सूचना मंडळांना पुन्हा देण्यात याव्यात असे आयुक्तांनी विभाग अधिकारी यांना सूचित केले.

मंडळांसाठी महापालिकेच्या सूचना

सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये गर्दी होणार नाही तसेच थर्मल गन, सॅनिटायझरची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन होईल याकडे बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विभाग कार्यालय पातळीवर पथके नेमून प्रत्येक पथकाकडे ठराविक संख्येने मंडळांची पाहणी करण्याची जबाबदारी निश्चित करून द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले. मागील वर्षी श्रीगणेशोत्सवानंतरच कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली होती या बाबीकडे विशेष लक्ष वेधत आयुक्तांनी त्यादृष्टीने विभाग कार्यालयांनी सतर्क रहावे व याकामी कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही असे स्पष्ट केले. कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीसोबत सर्व तलावांत योग्य पातळीपर्यंत पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या कृत्रिम तलावांची अखेरच्या विसर्जनदिनानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

विसर्जन स्थळांवरील व्यवस्था

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवरही प्रतिवर्षीप्रमाणे सर्व सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने त्याठिकाणी स्वयंसेवक व लाईफगार्ड्स व्यवस्था, तेथील विद्युतव्यवस्था, सीसीटिव्ही व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,  निर्माल्याचे ओले व सुके असे वेगवेगळे संकलन करणे, त्याचे पावित्र्य जपत योग्य रितीने विल्हेवाट लावणे तसेच कोणत्याही परिस्थितीत हार व पुजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे व यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे अशीही सूचना आयुक्तांनी केली.