हरिहरेश्वरच्या किना-यावर संशयास्पद बोटीत एके 47 रायफल्स

ऑस्ट्रेलियन नागरिक बोटीची मालक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • 18 ऑगस्ट 2022:

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या किना-यावर आज दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी हरिहरेश्वरला आढळून आलेल्या संशयास्पद बोटीत 3 एके 47 रायफल्स आढळून आल्या आहेत. (suspicious boat with AK 47 rifles) भरडखोलच्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य सापडले आहे.

याप्रकरणाची माहिती रायगडच्या आमदार अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत अधिवेशनादरम्यान दिली. या प्रकरणाची एटीएस मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. यानंतर जिल्ह्यात सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर उप मुख्यमंत्री(गृह) देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन

आज हरिहरेश्वरच्या किना-यावर  एक १६ मिटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिका-यांना याबाबत माहिती दिल्यानंतर या बोटीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या बोटीत 3 एके 47 रायफल्स आणि रायफल दारूगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला.

याबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. या बोटीचे नाव लेडीहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा या बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कत हून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26/06/2022 रोजी सकाळी १० च्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. १३.०० च्या सुमारास एका कोरियन युध्द नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकट ही नौका हरिहरेश्वर किना-यावर लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून प्राप्त झालेली आहे.

सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत.

भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांचेशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे.