ठाण्यात दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार

ठाणे, 22 जानेवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांना साथ न देण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महापालिका निवडणुकीत मात्र एकमेकांसोबतच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महालिका सध्या शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ठाणे काबीज करायचे या इराद्याने दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष जागा वाटपाबाबतचा निर्णय घेणार आहेत.

ही आघाडी घडवून आणण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला. सध्या महापालिकेत काँग्रेसचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 21 नगरसेवक आहेत. त्यामुळे विद्यमान संख्याबळाच्या प्रमाणात जागावाटप होण्याची शक्यता असून सामंजस्याने जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ठाणे महापालिकेसाठी शिवसेना- भाजप यांच्यात युती होणार की  नाही, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता शिवसेना-भाजप कोणता निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.