पामबीच रोडवरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई

  • हॉटेल पाम्स अटलांटिकचे अनधिकृत बांधकाम तोडले 

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 2 जून 2018:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे वाशी व तुर्भे विभागातील कोपरी गांव येथे पामबीच रोडलगत असलेल्या रस्ते व पदपथावर अनधिकृतपणे उभ्या केलेल्या चार चाकी गाड्यांवर कारवाई करण्यात आली.तसेच या वाहनचालकांकडून दंडापोटी 28 हजारांहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय सतरा प्लाझा येथील पाम्स अटलांटिक हुक्का पार्लरमधील अनधिकृत बांधकामही आज तोडण्यात आले.

 

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक मोहिमा राबविल्या जात आहेत. यामध्ये अनधिकृत बांधकामे, रस्ते – पदपथांवरील फेरीवाले, मार्जिनल स्पेसचा गैरवापर, विनापरवानगी होर्डींग – बॅनर्स यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. मोहन डगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभागाचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके, तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त अंगाई साळुंखे यांनी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने ही धडक मोहीम पार पाडली.

 

तुर्भे सेक्टर 19 डी, सतरा प्लाझा येथील हॉटेल पाम्स अटलांटिक हुक्का पार्लर मध्ये अनधिकृत पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्याबाबत संबंधितांना एम.आर.टी.पी. कायद्यामधील कलम 53(1) अन्वये रितसर नोटीसही देण्यात आली होती. मात्र संबंधितांनी कोणतीही दखल घेतली नाही तसेच स्वत:हून पोटमाळा काढला नाही.  त्यामुळे आज तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त अंगाई साळुंखे आणि  त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी पथकाने 15 कामगार व गॅस कटरच्या सहाय्याने पोटमाळा तोडून टाकला आणि 30 हजार रुपयांची रक्कम वसूल केली. या मोहिमेत 15 कामगारांसह 2 गॅस कटरच्या सहाय्याने ही धडक कारवाई करण्याती आली.


 

 

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक

 

 

  • पनवेल शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत …