ठाणे जिल्ह्यात शेअर प्रवासी वाहतूकीवर बंदी

अंमजबजावणी आजपासून लागू

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

ठाणे, 20 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप मधून सर्व सामान्य प्रवासी शेअरींगव्दारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात, त्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने इत्यादी 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना उपरोक्त अनु.क्र.04 मधील महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

​सर्व दुकाने आस्थापना पुढील आदेशापर्यत  बंद

ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना [अत्यावश्यक किराणा सामान ( GROCERY), दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय (CHEMIST SHOP) वगळून] तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप [ हॉटेल्समधील टेक अवे/ पार्सल (घरी जेवन घेऊन जाणे) सर्व्हीस वगळून] 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच जी किराणामालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच नागरिकांकरिता हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.