पावसाळ्याआधी कचराकुंडीचे अर्धवट बांधकाम पूर्ण करा

करावे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित मढवी यांची मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ जून २०२०

करावे गावाजवळील पामबीच भूयारीमार्गालगत गावदेवी मैदानाच्या बाजूला महापालिकेकडून कचरा कुंडी उभारण्यात येत आहे. मात्र त्या कचराकुंडीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे कचरा इतस्ततः पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कचरा कुंडीचे बांधकाम पूर्ण करावे आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी सीवुड करावे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित मढवी यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे.

करावे गावाजवळ पामबीच मार्गाच्या शेजारील गावदेवी उद्यानाच्या कडेला कचरा कुंडी आहे. मात्र तिचे बांधकाम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाईलाजाने नागरिकांकडून या अर्धवट असलेल्या कचराकुंडीच्या बाजूलाच कचरा टाकला जातो. मात्र कचरा इतस्ततः पसरत असल्यामुळ मोकाट कुत्री आणि पक्षांचा कचरा कुंडीजवळ सुळसुळाट झाला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून कचरा सर्वत्र पसरेल आणि दुर्गंधीसह रोगराई वाढेल, अशी भिती नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

या कचरा कुंडीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे यासाठी महापालिका प्रशासनाला साकडे घालण्यात आले आहे. मात्र अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात कचराकुंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भिती आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत  आहे. त्यातच स्वच्छतेबाबत योग्य ती काळजी न घेतल्यास साथीचे आजारही बळावण्याची मोठी भिती आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तातडीने या अर्धवट अवस्थेतील कचरा कुंडीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी अमित मढवी यांनी केली आहे.

=================================================

  • इतरही बातम्यांचा मागोवा