नवी मुंबईत महागडे मोबाइल चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

  • नवी मुंबई, १४ डिसेंबर २०२२

हातचलाखीने नागरिकांचे महागडे मोबाइल लंपास करणाऱ्या एका चोरट्याला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा -२ च्या पथकाने सापळा रचून कळंबोली स्टील मार्केट परिसरातून अटक केली आहे. या आरोपीकडून चोरलेले महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध घरांमधून सुमारे ७१ हजार रुपये किंमतीचे महागडे मोबाइल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी कळंबोली पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा २ कडून याबाबत तपास सुरु करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार विविध ठिकाणाहून महागडे मोबाइल चोरून ते विक्रीसाठी कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरात एक व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना मिळाली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सद्दाम हुसेन मोईन (३१) रा. कळंबोली (मूळ रहिवाशी उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्याची तपासणी केली असताना चोरलेल्यापैकी दोन मोबाइल (किंमत ५२,००० रुपये) जप्त करण्यात आले आहेत. अधिक चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी १ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास कळंबोली सेक्टर ३ ई व ५ ई परिसरातील विविध घरांमधून मोबाइल चोरल्याचे कबूल केले.

या मोबाइल चोरट्यांना पकडण्याच्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, सचिन पवार, ज्ञानेश्वर वाघ,इंद्रजित कानू, रुपेश पाटील, निलेश पाटील ,दिपक डोंगरे, राहुल पवार, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, प्रफुल्ल मोरे, महिला पोलीस नाईक गायकवाड, सावंत, पोलीस शिपाई संजय पाटील, विक्रांत माळी, अजित पाटील आदी सहभागी झाले होते.

=====================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप