अतिवृष्टीमुळे टोल वसुली थांबवली

मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा

मुंबई, 29 ऑगस्ट 2017/AV News Bureau: (no toll on mumbai entry points)

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मुंबई एन्ट्री पॉईंट्स आणि सागरी सेतू येथील पथकर वसुली थांबविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. देशाच्या पश्चिम भागात विशेषत: मुंबईमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनामार्फत सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपत्तीग्रस्तांच्या मदत आणि बचावकार्यासाठी गृह मंत्रालयाकडून एनडीआरएफ दलाच्या तुकड्या यापूर्वीच पाठवण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मुंबई एन्ट्री पॉईंट्स आणि सागरी सेतू येथील पथकर वसुली थांबविण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्षामार्फत विशिष्ट परिसरातील पाण्याच्या स्थितीबाबतही वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.(no toll on mumbai entry points)

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुपारी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन सर्व भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून करण्यात येत असलेल्या मदतीच्या कार्यवाहीचाही आढावा घेतला.