पेट्रोल पंपावर आजपासून डेबिट-क्रेडिटद्वारे व्यवहार नाही

नवी दिल्ली,8 जानेवारी :

पेट्रोल पंपांना डेबिट –क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहारावर 1 टक्का अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने या निर्णयाचा विरोध करीत आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट- क्रेडीट कार्डाद्वारे व्यवहार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आधीच नोटबंदीने त्रस्त झालेल्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. कार्ड वापरून इंधन मिळणार नसल्यामुळे मध्यरात्रीपूर्वी पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी पंपांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.

केंद्र सरकारने रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्डने व्यवहार केल्यास पेट्रोल-डिझेलवर ०.७५ टक्क्यांची सूट देण्याचे ठरवले आहे. मात्र बँकांनी हा भार पेट्रोल पंप चालकांवर टाकण्याचे ठरवले आहे. तशा सूचना पेट्रोल पंप चालकांना पाठविण्यात आल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीची भावना पसरली आहे.

आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बॅंकांनी शनिवारी रात्री सर्व पेट्रोल पंपांना सूचना पाठवली. त्यांनी १ टक्का अतिरिक्त शुल्क लावले जाईल असे म्हटले. ही नोटीस आल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय जर मागे घेतला नाही तर आम्ही कार्ड स्वीकारणार नाही असे त्यांनी बॅंकांना सांगितले.