ठाण्याच्या भिंती बोलू लागल्या मतदानाचे बोल

ठाणे,  २५ जानेवारी 2017/AV News Bureau:

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आणि ठाणे सिटीझन फोरम आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ठाणेशहरातील भिंतींवर  मतदानाचे महत्व सागणारे संदेश देण्याची अभिनव व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून डिसेंबरपासून  ‘भिंती रंगवा..ठाणे सजवा’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमाचा निवडणूक जनजागृतीसाठी उपयोग करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून या भिंतींवर ‘मतदान करा’ चे संदेश तमामनागरिकांना देण्यात येत आहेत.

ठाणे सिटीझन फोरम या संस्थेसह शहरातील अनेक सेवाभावी सस्था, शाळांचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात या जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी होवून भिंती रंगवून ‘ लोकशाही बळकट करण्यासाठीमतदान करूया’ असे संदेश नागरिकांना देण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपलामतदानाचा हक्क बजावावा यासाठी आम्ही व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून भिंती रंगवून मतदानाचे महत्व पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.