विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची 2,3 मेरोजी पडताळणी

मुंबई, 21 एप्रिल 2017/AV News Bureau:

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील 3 हजार 34 उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी येत्या 2 व 3 मे रोजी संबंधित परिमंडलस्तरावर करण्यात येणार आहे. 2 मे रोजी खुल्या प्रवर्गातील तर 3 मे रोजी राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

महावितरणच्या जाहिरात क्र. 1/2014 नुसार विद्युत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या 3हजार 34 उमेदवारांची नियुक्ती विद्युत सहाय्यक म्हणून करण्यात येणार आहे.

प्रतीक्षा यादीतील 3 हजार 34 उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर विद्युत सहाय्यक या पदाचे नियुक्तीपत्र संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जाची प्रत तसेच पडताळणी बाबतच्या सूचना महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  तसेच सर्व उमेदवारांना ग्रुप एसएमएसद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे.

उमेदवाराने ऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीत तफावत अथवा माहिती चुकीची दिल्याचे पडताळणीत आढळल्यास उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल.