शिवसेनेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वास

पनवेल, 26एप्रिल 2017/AV News Bureau:

भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षांची पनवेल महापालिकेतही मोलाची साथ लाभेल.मित्र पक्षांपैकी रिपाइं आमच्या सोबत असून शिवसेनेसोबत युतीची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अगोदर चर्चा करून येत्या दोन ते तीन दिवसांतच राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.

राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रितपणे पनवेल महापालिकेतील सर्व जागा लढवणार असल्याच्या बातम्या माध्यमांमधून चर्चिल्या जात आहेत.  मात्र या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात सत्तेत आल्यास सत्तेतील वाटा देण्याचे वचन भाजपाच्या नेतृत्वाने या मित्रपक्षांना दिले होते. हे वचन आमच्या राज्यातील नेतृत्वाने पाळल्याने कोणत्याही मित्रपक्षाची कुठलीच तक्रार नाही. त्यामुळेच पनवेल महापालिकेतही या सर्व मित्र पक्षांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसादच मिळेल,असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.