सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा

रुग्णांच्या विविध चाचण्या मोफत होणार

मुंबई, 12 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत रक्त, लघवी आणि तत्सम वैद्यकीय नमुने चाचण्या करुन घेण्यासाठी आता वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅबोरेटरी) सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या मेसर्स एचएलएल लाईफकेअर लिमिटेड या कंपनीसमवेत महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेने करार केला आहे.

मेसर्स एचएलएल लाईफकेअर लिमिटेड यांच्यासोबत पाच वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. या करारानुसार मेसर्स एचएलएल लाईफकेअर ही कंपनी राज्यात विविध ठिकाणी लॅब स्थापन करणार आहे. लॅबला संलग्न शासकीय रुग्णालये व संस्थांमधून नमुने संकलन करुन लॅबमध्ये आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. या चाचण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क शासनाकडून दिले जाणार असून त्यामुळे रुग्णांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे.

  • 16 जिल्ह्यांमध्ये सेवा सुरू

पुणे, ठाणे, नंदुरबार, जालना, बीड, रायगड, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, रत्नागिरी, धुळे, गोंदिया, जळगाव, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग या 16 जिल्ह्यांमधील काही आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये काही प्रमाणात ही सेवा उपलब्ध झाली आहे. टप्प्याटप्प्याने राज्‍यातील इतर आरोग्य संस्थांमध्ये त्याचा विस्तार होणार आहे.

चाचण्यांसाठी वेळ

  • मेसर्स एचएलएल लाईफकेअर लिमिटेड यांचे कर्मचारी शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांचे वैद्यकीय नमुने संकलन करण्यासाठी नेमून दिलेल्या वेळेत हजर राहणार आहेत.
  • प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत;
  • ग्रामीण रुग्णालये तसेच 50 खाटांपेक्षा कमी क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत;
  • 100 खाटांपेक्षा जास्त क्षमतेची उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, मनोरुग्णालये आणि प्रादेशिक संदर्भसेवा रुग्णालये यामध्ये सकाळी 8 ते दुपारी 30
  • सायंकाळी 4 ते 30 पर्यंत नमुने संकलन करण्यात येणार आहेत.
  • अतिदक्षता व वैद्यकीय आपत्कालीन स्थितीवेळी बोलावताच हजर या तत्त्वानुसार 24 तास सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  1. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 25 प्रकारच्या, ग्रामीण रुग्णालये तसेच 50 खाट क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये 32 प्रकारच्या चाचण्या करणे शक्य होणार आहे. 100 खाटांपेक्षा जास्त क्षमतेची उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, मनोरुग्णालये आणि प्रादेशिक संदर्भसेवा रुग्णालये यांमध्ये सुमारे 52 प्रकारच्या चाचण्या करण्यात येतील.
  1. या संकलित केलेल्या नमुन्यांचे अहवाल संबंधित आरोग्य संस्थाच्या इ-मेल (Email ID) वर तसेच डॅश बोर्ड (Dash Board) वर विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यात येतील. या अहवालांच्या प्रती दुसऱ्या दिवशी आरोग्य संस्थाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात येतील.