रिपब्लिकन सेनेचा आज सिडकोवर मोर्चा

नवी मुंबई, ९ जून २०१७/AV News Bureau:

पावसाळ्याच्या तोंडावरच सिडकोने झोपड्यांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्यावतीने आज दुपारी ३ वाजता सिडको भवनवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

३१ मे ते सप्टेंबर या काळात पावसाळा सुरू असताना कोणत्याही घरावर कारवाई करू नये असे शासनाने सिडकोला आदेश दिले आहेत. तसेच राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या अनधिकृ बांधकामांवर कारवाई करू नये असे आदेश दिलेले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सिडकोच्या अतिक्रमण विभागाने शहरात अनेक ठिकाणी पावसाळा तोंडावर आलेला असताना सिडकोच्या जागेवर असलेल्या झोपड्यांवर कारवाई केली आहे. सिडकोच्या या कारवाईमुळे गरीबांचे संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडले आहेत. सिडकोच्या या मनमानी कारवाईविरोधात रिपब्लिकन सेनेच्यावतीने आज दुपारी सिडको भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा प्रमुख खाजामिया पटेल यांनी दिली.

सिडकोने लॉटरी पद्धत बंद करावी. तसेच कारवाई केलेल्या गरीबांना अल्पदरात घरे उपलब्ध करून द्यावीत  आदी मागण्यांसाठी आम्ही आम्ही शांततेत मोर्चा काढणार आहोत, असे पटेल यांनी सांगितले.