स्वच्छ सर्व्हेक्षण 2017  सुरू

 नवी मुंबई, 4 जानेवारी 2017/ AV News Bureau :

  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 4 जानेवारी 2017 पासून क्वालिटी कौंसिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत नागरिकांनी स्वच्छतेविषयक तक्रारी करण्यासाठी Swachhta MoUD App  आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करायचा आहे. हे ॲप डाऊनलोड करताना नागरिकांनी नवी मुंबई हे आपले ठिकाण नमूद करावयाचे आहे. नागरिक या ॲपवर फोटोसहित आपली स्वच्छतेविषयी तक्रार दाखल करू शकतात. ही तक्रार थेट केंद्र सरकारच्या निदर्शनास येत असून त्यावर स्थानिक प्राधिकरण अर्थात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्वरीत निवारण करण्यात येणार आहे.

4 जानेवारी पासून करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षण कालावधीमध्ये टोल फ्री क्रमांक 1969 वर स्वच्छतेविषयक सहा मुद्यांबाबत आपले अभिप्राय नोंदविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

  • पहिला प्रश्न आपले शहर स्वच्छ सर्व्हेक्षण2017 मध्ये होणा-या स्वच्छता रॅकींगमध्ये सहभागी होत आहे ही बाब आपणांस माहित आहे काय?
  • दुस-या प्रश्नामध्ये आपला परिसर मागील वर्षापेक्षा अधिक स्वच्छ राखला जातो काय? अशी विचारणा करण्यात येईल.
  • तिसरा प्रश्न यावर्षी मार्केट परिसरामध्ये उपलब्ध कचरा कुंड्यांची स्थिती सुधारली आहे काय? असा विचारण्यात येईल.
  • चौथ्या प्रश्नात यावर्षी घराघरांतून कचरा संकलन करणे व उचलणे याबाबत आपण समाधानी आहात काय? असा अभिप्राय विचारला जाईल.
  • पाचवा प्रश्न मागील वर्षाच्या तुलनेत मुतारी व शौचालयांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे काय? अशी माहिती घेण्यात येईल.
  • आणि सहाव्या प्रश्नात सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीमध्ये सुधारणा जाणवते आहे काय? असे विचारले जाईल.

तरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 मध्ये होणा-या आपले नवी मुंबई शहर देशातील स्वच्छ शहर बनविण्यासाठी नागरिकांनी आपला अमूल्य सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.